यवतमाळ : ५०० रुपयांच्या ९६४ बनावट नोटा जप्त

५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात वापरण्यासाठी घेऊन येणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पुसद-वाशीम मार्गावरील मारवाडी फाटा या गावाजवळ शुक्रवारी पहाटे करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पुसद-वाशीम मार्गावरील मारवाडी फाटा येथे रात्री नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणे सुरू केले. गोपनीय माहितीप्रमाणे वर्णनाचा एक व्यक्ती दुचाकीने (क्र. एम.एच. २९ व्ही.वाय. ८६३७) आलेल्या विशाल नागोराव पवार (३४, रा. खामनवाडी, पो. कासोळा, ता. महागांव, ह.मु. पुसद, जि. यवतमाळ) याच्या वाहन व बॅगची झडती घेतली. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. अधिक चौकशी करून तो राहत असलेल्या घराची झडती घेऊन त्याने विक्रीकरिता आणलेल्या ५०० रुपये किंमतीच्या ९६४ बनावट नोटा (किंमत चार लाख ८२ हजार रुपये) व दुचाकी जप्त केली.

आरोपी विशाल नागोराव पवार याच्याविरुद्ध पोलीस ठाणे खंडाळा येथे गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी विनोद गंगाराम राठोड (४२, रा. सुभाष वार्ड, पुसद) व बालू बाबुराव कांबळे (४६, रा. परळी वैजनाथ, जि. बिड) या दोन संशयितांना ‘स्थागुशा’ पथकाने ताब्यात घेतले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सहभागी इतर आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेची इतर पथके चौकशी करत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात अमोल सांगळे, सागर भारस्कर, सुभाष जाधव, कुणाल मुंडकार, सोयल मिर्झा, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, दिगंबर गीते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

×